डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाअधिवेशन सावंतवाडीत

उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस करणार

मुंबई : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाअधिवेशन येत्या 6 एप्रिल 2025 रोजी सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) येथील भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे. या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अधिवेशनाचे निमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारत अधिवेशनात सहभागी होण्याची ग्वाही दिली.

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागांसह गोव्यातील डिजिटल पत्रकारही सज्ज झाले आहेत. सावंतवाडी येथील महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तर सहस्वागताध्यक्षपद भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले यांनी स्वीकारले आहे. अधिवेशनाचे मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षणमंत्री आ.दीपक केसरकर उपस्थित राहतील.

या अधिवेशनाचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री तथा खा.नारायण राणे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आ.निलेश राणे यांनी स्वीकारलेले आहे. अधिवेशनाच्या संयोजन समितीचे प्रमुख म्हणून संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भरत केसरकर हे कार्यरत आहेत. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध व्यापक समित्या गठित होत आहेत. कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्र्यांना निमंत्रित केले जाणार आहे.