पीएम उषा प्रकल्पाअंतर्गत गोंडवाना विद्यापीठाला 104 कोटींचा निधी !

आज पंतप्रधान करणार डिजिटल लॉंचिंग

गडचिरोली : राज्यातील विद्यापीठांमध्ये समानता, प्रवेश आणि उत्कृष्ठतेची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चशिक्षण अभियान (PM-USHA) योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेची सुरुवात मंगळवारी (दि.20) पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहे. या योजनेचा एकूण खर्च 12 हजार 926.10 कोटी इतका आहे. त्यातील 104 कोटींचा निधी गोंडवाना विद्यापीठाला मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत गोंडवाना विद्यापीठाचा कार्यक्रम आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11:30 वाजता आभासी पध्दतीने (थेट) मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 11 वाजता कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आभासी पध्दतीने उपस्थित राहून संबोधित करण्याची शक्यता आहे, असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले.

काय आहे पीएम उषा प्रकल्प योजना?

या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये दर्जेदार शिक्षण आणि शिक्षण प्रक्रियेच्या विकासावर भर देणे, मान्यता नसलेल्या संस्थांची मान्यता सुधारणे, डिजिटल पायाभूत सुविधांवर भर देणे, मल्टीडिसिप्लिनरी मोडद्वारे रोजगारक्षमता वाढविणे यावर भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. याचा लाभ गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी घेण्याचे आवाहन कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले आहे.