गोंडवाना विद्यापीठाने रॅलीद्वारे दिले ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला प्रोत्साहन

देशभक्ती जागविण्यासाठी बनविले सेल्फी स्टँड

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या ७५ व्या, अर्थात अमृत महोत्सवांतर्गत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून गोंडवाना विद्यापीठाकडून रॅली काढण्यात आली. यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी हाती तिरंगा घेत व भारतमाता की जय, अशा घोषणा दिल्या.

याप्रसंगी संचालक डॉ.श्याम खंडारे यांनी तिरंगा हा साऱ्या भारताचा अभिमान आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये असंख्य देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आपला देश स्वतंत्र झाला. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेद्वारे या स्वातंत्र्यसैनिकांना आपण आदरांजली अर्पण करत आहोत, असे मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी सेल्फी स्टँण्ड उभारण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या आयोजनप्रसंगी रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रमोद जावरे यांनी प्रास्ताविक व आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.