रोजगाराच्या संधीसाठी ‘गोंडवाना’चे विद्यार्थी शिकणार इटालियन भाषा

कॅान्सुलेट जनरलसोबत कुलगुरूंची चर्चा

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना इटलीच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी इटालियन भाषा शिकवली जाणार आहे. यासंदर्भात विद्यापीठ आणि कॅान्सुलर जनरल ऑफ इटली यांच्यात एक सामंजस्य करारही केला जाणार आहे. त्यासंदर्भात इटलीचे कॅान्सुलेट जनरल वॉल्टर फरारा यांच्यासोबत कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांची विस्तृत चर्चा पार पडली.

इटली येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या हेतून इटालियन भाषा शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासंदर्भात गाोंडवाना विद्यापीठ आणि कॅान्सुलेट जनरल ऑफ इटली इन मुंबई यांच्यासोबत लवकरच सामंजस्य करार होणार आहे. या सामंजस्य करारबाबत कॅान्सुलेट जनरल ऑफ इटली वॉल्टर फरारा यांच्यासोबत नागपूर येथे बैठक पार पडली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, डॉ.मनिष उत्तरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

कॅान्सुलेट जनरल वॉल्टर फरारा यांच्या म्हणण्यानुसार आरोग्यासंबंधित यंत्रसामुग्री व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात इटलीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याअनुषंगाने चर्चा करण्यात आली. याव्यतिरीक्त इटली भाषेशी संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इटली सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीबाबतही चर्चा करण्यात आली.