गडचिरोली : गडचिरोलीत आजपासून तीन दिवस ‘लोकनृत्य भारत भारती’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होणार आहे. शहरातील विद्याभारती कन्या हायस्कूलमध्ये आज संध्याकाळी 6.30 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसीत महोत्सव होईल. सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे संचालक विभीषण चवरे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी त्यासाठीचे नियोजन केले आहे. या महोत्सवासाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती व लोककला पुनर्जीवित करण्यासाठी, तसेच नव्या पिढीला याची ओळख करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन संयुक्तपणे प्रयत्नशील आहे.
काय-काय असेल या महोत्सवात?
या तीन दिवसीय महोत्सवामध्ये भारताच्या विविध राज्यांतील लोकनृत्यांच्या सादरीकरणांचा मनमोहक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध लावणी / कोळी नृत्य, मध्य प्रदेशचे बधाई / नोरता नृत्य, राजस्थानचे रंगीला कालबेलिया / भवई / चरी नृत्य, हरियाणाचे घुमर / फाग नृत्य, गुजरातचे सिद्धी धमाल नृत्य, ओडिशाचे सांबलपुरी / दालखाई नृत्य आदींचा समावेश राहणार आहे.
विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर गोडबोले, सांस्कृतीक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.