गडचिरोली : राज्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलीच्या सर्वागीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने संयुक्त मोहिम राबविली जाणार आहे. गडचिरोलीत या मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी 8.30 वाजता शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत होणार आहे.
राज्यस्तरीय कार्यक्रमाचा ऑनलाईन शुभारंभ उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. तालुकास्तरावरही या मोहिमेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी दिली.
या मोहिमेत 0 ते 18 वर्षापर्यतच्या बालकांची, किशोरवयीन मुलामुलींची तपासणी, आजारी आढळलेल्या बालकांवर तात्काळ उपचार, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे, सुरक्षित आरोग्यसाठी समुपदेशन यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील मुला-मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी केले आहे.