दिव्यांग आणि वृद्ध मतदारांची रथावरून मिरवणूक, पिंक बुथही ठरले आकर्षण

जिल्हाधिकाऱ्यांची वडीलांना अनोखी श्रद्धांजली

गडचिरोली : मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी गडचिरोली शहरात प्रशासनाच्या वतीने नवमतदार, दिव्यांग आणि वृध्द यांची प्रतिनिधीक स्वरूपात रथावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. बँडपथकासह वाजतगाजत मिरवणुकीने त्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर आणि इतर अधिकारी, तसेच कर्मचारी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

गुलाबी रंगात सजले सखी मतदान केंद्र

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक सखी मतदान केंद्र होते. गडचिरोलीत पंचायत समितीच्या आवारात हे केंद्र होते. या सखी मतदान केंद्रात मतदानाची सर्व जबाबदारी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांभाळली. विशेष म्हणजे हे केंद्र पूर्णपणे गुलाबी रंगाचा मंडप, फुगे यांनी सजविले होते. एवढीच नाही तर या केंद्रावरील महिला कर्मचारीही गुलाबी रंगाच्या पेहरावात होत्या.

मतदानातून जिल्हाधिकाऱ्यांची वडीलांना श्रद्धांजली

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांच्या वडीलांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाले. अशाही स्थितीत त्यांनी दोन दिवसात पुन्हा गडचिरोली गाठून कर्तव्यावर हजर होत निवडणूक यंत्रणेची धुरा हाती घेतली. शिवाय गडचिरोलीत मतदानही केले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याबाबत माझे वडील खूप उत्साही असायचे. त्यामुळे मतदानाचे कर्तव्य बजावणे हिच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.