दुर्गम जारावंडीत नागपूरच्या आयुर्वेद उत्कर्ष मंडळाकडून आरोग्य जागृती

मोफत रोगनिदानासह औषधींचे केले वाटप

जारावंडी परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना डॅा.प्रमोद साळवे

एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी या दुर्गम भागात आयुर्वेद उत्कर्ष मंडळ विदर्भ प्रदेश नागपूरच्या वतीने दि.२८ रोजी आरोग्य जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून रोगनिदान करण्यात आले. तसेच औषधीचे वाटप करण्यात आले. १४१ रुग्णांनी शिबिरात सहभागी होऊन औषधोपचार घेतले.

ग्रामपंचायत भवनात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन सरपंच सपना कोडापे यांनी केले. यावेळी उद्घाटनपर भाषणात त्या म्हणाल्या, आपल्या आरोग्य चिकित्सेसाठी आणि संवर्धनासाठी आयुर्वेद उत्कर्ष मंडळाच्या रूपाने डॅाक्टर्स आपल्या दारी आले आहेत. आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या या भागात अशा शिबिरांची गरज असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपसरपंच सुधाकर टेकाम, ग्रामपंचायत सदस्य दिलीप दास, जारावंडीचे वन अधिकारी पंधरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक डॅा.साळवे नर्सिंग कॅालेज स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष निकिता सडमेक यांनी तर आभार प्रदर्शन दीप्ती बेलसरे यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल मेश्राम, गुरूदेव शेडमाके, दिलीप कुमरे, तसेच जारावंडी येथील रमजान पठान, पोलीस पाटील जनकशहा नाशमुर्ते, वैभव बेलसरे, नागेश बेलसरे, तसेच शितल पदा, मालती सिकंदर, साक्षी मडावी, दिव्या मडावी, किरण दुग्गा, अपर्णा तुलावी, सोनाली धुडसे, अंजली चंद्रागडे, आचल मेश्राम, शुभांगी गेडाम इत्यादींनी सहकार्य केले.

निरोगी समाज म्हणजेच सुखी समाज- डॅा.साळवे
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॅा.प्रमोद साळवे म्हणाले, आरोग्यप्रति जागरूक राहणे काळाची गरज आहे. आरोग्याकडे लक्ष दिले नाही, किंवा अवहेलना केली तर काय होते हे आपल्याला कोरोनाने दाखविले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी निसर्गाने सांगितल्यानुसार आहार, विहार करावा. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, यामुळे मलेरियासारख्या आजाराला दूर ठेवता येते असे त्यांनी सांगितले. शरीराला हाणीकारक असे व्यसन करु नये. मेहनतीच्या रूपाने व्यायाम करून शरीर काटक बनवावे, असे ते म्हणाले. नागरिकांची ईच्छा असल्यास आणि त्यांनी योग्य सहकार्य केल्यास येथे आरोग्य संवर्धनासाठी अत्यंत चांगल्या आरोग्य सोयी निर्माण केल्या जाईल, असा विश्वास डॅा.साळवे यांनी व्यक्त केला.