३६ वर्षांनंतर गडचिरोलीत भेटले वर्गमित्र-मैत्रिणी

जिल्हा परिषद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मित्रोत्सव

गडचिरोली : शाळेचे दिवस, त्या दिवसात सोबत असलेले वर्गमित्र-मैत्रिणी, त्यांच्यासोबतच्या आठवणी म्हणजे माणसाच्या आयुष्यातील एक ठेवा असतो. कुठेही असलो तरी शाळेतील ते दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. शाळेतील तो मित्रपरिवार आयुष्यात पुन्हा कधी भेटेल याची शाश्वतीही नसते. पण येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ३६ वर्षानंतर स्नेहमिलन आयोजित करण्याचा योग तत्कालीन वर्गनायक उदय धकाते यांनी घडवून आणला. या मित्रोत्सवाने सर्व मित्र-मैत्रिणी जुन्या आठवणीत रमून गेले होते.

गडचिरोलीमधील जि.प.हायस्कूलमध्ये शिकत असताना ४५ वर्षापूर्वी या वर्गमित्रांची ओळख झाली. १० वर्षपर्यंत ते सोबत शिकले. त्यानंतर १९८६-८७ मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. विविध क्षेत्रात ते सेटल झाले. असे ५० वर मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या शहरांमधून तब्बल ३६ वर्षानंतर गडचिरोली शहरात एकत्र आले. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षिका लीलाबाई पेंदाम, माजी उपशिक्षणाधिकारी राजनहीरे, सेवानिवृत्त शिक्षक आयलावार, सेवानिवृत्त शिपाई गाठे बाई, सेवानिवृत्त शिपाई जुनघरे, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक चंदनगिरीवार, वर्गनायक उदय धकाते यांची उपस्थिती होती.

या मित्रोत्सवासाठी गुजरात, मध्यप्रदेश, छतीसगड, मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणाहून जुने मित्र एकत्र आले होते. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पार पडला. सदर कार्यक्रमासाठी निमेश पटेल, उल्हास बाटवे, नितीन भडंगे, अपर्णा रोटकर-देव, ममता कवठे-डांगे, धर्मेंद्र मुनघाटे, प्रकाश पंधरे, दमयंती धकाते-नंदुरकर, प्रतिभा खोब्रागडे-काळे, संगीता चन्नावार-इटकेलवार, गीता मगरे-ठाकरे, सुलभा जांभुळे-नारनवरे, सुनील पेंदोरकर, गीता गुरुनुले-लेनगुरे, शैलजा गारोडे-वनमाली, सुरेश पेंदाम, देवेंद्र सज्जनपवार, रवींद्र सूर्यवंशी, रमेश टेकाम, मुकुंद वाढई, विद्या हजारे-कवठे, प्रज्ञा बागेसर-गायकवाड, अनुसया बावणे यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोलीचे सभागृह रांगोळी आणि फुलांनी सजविण्यात आले होतेय. मित्र-मैत्रिणींचा सुंदर परिचय हे कार्यक्रमाचे आकर्षण होते. प्रत्येकास स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले. जुन्या काळातील शिक्षक-शिक्षिका, चपराशी यांना भेटून माजी विद्यार्थी आनंदित झाले. ३६ वर्षानंतरच्या या भेटीने सर्वजण गहिवरले.