अयोध्येच्या अक्षता पोहोचल्या गडचिरोलीत, मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

खासदार अशोक नेते यांच्याकडून वाटप

गडचिरोली : येत्या 22 जानेवारीला भगवान श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या येथे मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त घरोघरी भगवान श्रीरामाचे पूजन व्हावे, भजन व कीर्तन व्हावे, तसेच 22 जानेवारीचा दिवस घराघरांमध्ये रांगोळी, दिवे लावून दिवाळी सणासारखा जल्लोषात साजरा करावा, असे आवाहन केले जात आहे. अयोध्येला दर्शनाला जाण्याचे निमंत्रण म्हणून अयोध्यावरून आलेल्या अक्षतांचे वाटप केले जात आहे. खासदार अशोक नेते यांनीही यात सहभाग घेऊन गडचिरोलीत अक्षतांचे वाटप केले.

ज्यांना अयोध्येला जाणे शक्य नाही त्यांनी दि.22 ला देवघरासमोर किंवा मंदिरामध्ये अक्षता अर्पण कराव्या यासाठी प्रत्येक घरोघरी अक्षता वाटपाचा कार्यक्रम भारतभर, विश्वभर सुरू आहे. हे अभियान 14 जानेवारीपर्यंत असल्यामुळे गडचिरोली शहराच्या मुख्य मार्केट परिसरात खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या नेतृत्वात अक्षता वाटप करण्यात आले.

यात जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, दिलीप खडसे, शहराध्यक्ष (धानोरा) सारंग साळवे इत्यादींनी सहभाग घेऊन गडचिरोली शहरातील जुनी वस्ती, त्रिमूर्ती चौक आणि दुर्गा मंदिर, व्यापारी लाईन परिसरात घराघरांत फिरून अक्षतांचे वाटप केले. हे अभियान पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन अक्षतांचे वाटप करावे, असे आवाहन याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.