कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा कृषि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

शेतकरी, बचत गटांचा सहभाग

गडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सव २०२३-२४ चे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्याया कृषी मोहत्सवाचे उद्घाटन खा.अशोक नेते यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आत्माचे प्रकल्प संचालक पंढरी डाखळे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, महिला आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) जिल्हा व्यवस्थापक विष्णुपंत झाडे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्रज्ञ डॉ.संदीप कऱ्हाळे, कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ.माया राऊत, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक एन.व्ही.पौनिकर आणि भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आपल्या उद्घाटपर भाषणात खा.अशोक नेते यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी महोत्सवाची मदत होणार आहे. तसेच तालुकानिहाय शिबिर व बैठका घेऊन शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची सूचना त्यांनी विविध विभागांना केली. शेतीसोबतच पुरक व्यवसाय करून आपले उत्पन्न दुप्पट करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

२७ जानेवारी चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात जवळपास २०० स्टॅाल लागले आहेत. सदर कार्यक्रमास शेतकरी, महिला, स्थानिक नागरिकांनी भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक पंढरी डाखळे यांनी केले.