ओबीसी, एसबीसी विद्यार्थ्यांना आता उच्चशिक्षणासाठी ‘ज्ञानज्योती’चा आधार

आ.कृष्णा गजबे यांच्या मागणीला यश

गडचिरोली : शासकीय वसतिगृहांत प्रवेशाकरीता अर्ज करूनही जागेअभावी प्रवेश मिळू न शकलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता लागू करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेप्रमाणे ओबीसी, व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही स्वाधार योजना लागू करण्याची आमदार कृष्णा गजबे यांनी केली होती. त्या मागणीनुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू केली आहे.

या नवीन योजनेमुळे वसतिगृहात जागेअभावी प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या ओबीसी, व्हिजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. गरीब गरजु विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

बहुजन समाजाला न्याय देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांचे आभार व्यक्त केले.