गडचिरोली तालुक्यात आणखी एका महिलेसह पुरूष शेतकऱ्याचा वाघाने घेतला बळी

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची धाव, व्यक्त केली नाराजी

घटनास्थळी पाहणी करताना काँग्रेसचे डॅा.नामदेव किरसान आणि इतर

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येथील इंदिराबाई उमाजी खेडेकर (55 वर्ष) आणि भगवानपूरच्या गंगाराम कवडू फुबेलवार (५४) या शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याच्या घटना शुक्रवारी उघडकीस आल्या. इंदिराबाई शेतीचे काम करून घराकडे येत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने इंदिराबाईवर हल्ला केला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर गंगाराम हे तीन दिवसांपासून बेपत्ता होते. शोधाशोध केल्यानंतर शुक्रवारी जंगलात कवटीचा भाग आणि हाताचे पंजे आढळले. हाताला बांधलेल्या राखीवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. वारंवार अशा घटना होत असल्याने स्थानिक लोकांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष निर्माण होत आहे.

हिरापूरच्या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, नितेश राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतक इंदिराबाईच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सतत मागणी केली जात असताना देखील प्रशासन, पालकमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडून या मागणीला घेऊन कानाडोळा केल्या जात आहे. जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या राज्याच्या निवडणुकात व्यस्त आहेत. त्यामुळे अजून किती निरपराध लोकांचा जीव घेण्याची वाट पालकमंत्री पाहात आहे? असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे. लवकरच पालकमंत्री आणि वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.