आपण यांना पाहिलंत का? अल्पवयीन मुलीसह अपहरणकर्त्याचा सर्वत्र शोध सुरू

सिरोंचा : तालुक्यातील बामणी उपपोलीस स्टेशनअंतर्गत टेकडा येथून रात्रीच्या सुमारास अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या तेलंगणातील युवकाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे त्या दोघांचेही छायाचित्र असलेले पत्रक प्रसिद्ध करत बामणी पोलिसांकडून त्यांचा तेलंगणासह इतर सर्वत्र शोध घेतला जात आहे.

एलिया मोहन कोत्तुरी (२१ वर्ष) असे अपहरणकर्त्या युवकाचे नाव तर अश्विनी चिन्नामधुकर कोत्तुरी (१७ वर्ष) असे अपहृत अल्पवयीन युवतीचे नाव आहे. दि.२४ मे रोजी मध्यरात्रीनंतर अश्विनी हिचे तिच्या मामाच्या घरून आरोपीने एलिया याने अपहरण केल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी एलिया याच्याविरोधात भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करत दोघांचाही शोध सुरू केला आहे.

अश्विनी ही अकरावीला शिकत होती. तिची उंची ५ फूट असून रंग गोरा तर शरीराचा बांधा सडपातळ आहे. अपहरण झाले त्यावेळी तिच्या अंगावर आकाशी रंगाचा सलवार आणि पांढऱ्या रंगाची लॅगीन होती अशी माहिती पोलिसांनी दिली. एलिया हा तेलंगणातील रहिवासी असल्यामुळे त्याने तेलंगणातच कुठेतरी अश्विनीला लपवून ठेवले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. यासंदर्भात कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक मदन मस्के (९४२१९२३२४४) किंवा पो.उपनिरीक्षक दीपक पारधे (९६५७७०८१३८) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.