गडचिरोली : खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे व इतर पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यांना अचानक आलेले पाहून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अचंबित झाले. अतिदक्षता विभागाला त्यांनी भेट देऊन काही रुग्णांशी संवाद साधला.
भाजपाचे आंबेशिवणी येथील बुथ प्रमुख पुरुषोत्तम सूर्यवंशी यांची पत्नी शितल यांना दुपारी शेतामध्ये काम करीत असताना अचानकपणे विषारी सापाने दंश केला. याशिवाय साखरा येथील सर्पमित्र अक्षय हुलके हे विषारी सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी जात असताना त्यांनाही सर्पदंश झाला.
या दोन्ही घटनेची माहिती मिळाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान खासदार अशोक नेते हे शासकीय विश्राम भवनात असल्याने त्यांनाही याबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे खासदार नेते यांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन सूर्यवंशी आणि हुलके यांच्यासोबत आयसीयूमध्ये असलेल्या सर्व रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके यांना त्यांनी योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली.तसेच जिल्ह्यातील आरोग्याच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, अनिल करपे उपस्थित होते.