काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेच्या तयारीसाठी एकवटले जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी

प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते येणार

गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही पदयात्रा ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून शुक्रवारी (दि.25) गडचिरोलीत काँग्रेसच्या जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या पदयात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, विरोधी पक्ष नेते, माजी मंत्री आ.विजय वड्डेट्टीवार यांच्यासह अखिल भारतीय स्तरावरील काही नेते, तसेच आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, प्रदेश स्तरावरील नेते मंडळी सहभागी होणार आहे.

या पदयात्रेची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यात 3 सप्टेंबरला विदर्भाची काशी मार्कडा येथून होणार आहे. ही पदयात्रा पुढे चामोर्शी, गडचिरोली, आरमोरीमार्गे वडसा तालुक्यात पोहचणार आहे. याच्या नियोजनाकरिता शासकीय विश्राम भवनात जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष कविता मोहरकर, काँग्रेस नेते जेसा मोटवाणी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.