एमपीएससी परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अहेरीच्या सुपुत्राचा सत्कार

इतरांनीही प्रेरणा घ्यावी- अंब्रिशराव आत्राम

अहेरी : एमपीएससी परीक्षेत अहेरी राजनगरीच्या शुभम येलेश्वर कोमरेवार यांनी महाराष्ट्र राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्यांची मत्स्य व्यवसाय विभागात सहायक आयुक्त म्हणून निवड झाली. त्यानिमित्त माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते त्यांचा राजमहालात शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी शुभमचे आई-वडील तसेच त्याचा आप्त परिवार आणि अहेरीकर नागरिक उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील आणि अहेरी नगराच्या सुपुत्राने राज्यस्तरावर प्रथम येणे ही या क्षेत्रासाठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. इतर युवक युवतींनी शुभमची प्रेरणा घेऊन या भागाचे व जिल्ह्याचे नाव उंचवावे, असे प्रतिपादन अंब्रिशराव आत्राम यांनी यावेळी बोलताना केले.

2019 मध्ये शुभम यांची सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी या पदावर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून मत्स्य व्यवसाय विभागात सहायक आयुक्त म्हणून स्थान पटकावले.

शुभम यांचे वडील येलेश्वर कोमरेवार सेवानिवृत्त केंद्र प्रमुख तर आई रत्नप्रभा शिक्षिका आहेत. त्यांची बदली झाल्यानंतर शुभमचे प्राथमिक शिक्षण धानोरा तालुक्यातील इरूपटोलाच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी शाळेत माध्यमिक शिक्षण झाले तर महाविद्यालयीन शिक्षण मत्स्य व पशुधन विद्यापीठ नागपूर येथे झाले.