छत्तीसगडच्या सीमेत घुसून उद्ध्वस्त केला नक्षलवाद्यांचा कॅम्प, साहित्य जप्त

सी-६० आणि डीआरजी कमांडोंची संयुक्त कारवाई

चकमक उडाली त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेले नक्षल्यांचे साहित्य

गडचिरोली : गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत जंगलातील नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात यश आले. यावेळी अर्धा तास चकमक झाली. त्यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यांचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे. ही कारवाई बुधवारी संध्याकाळी करण्यात आली.

गडचिरोली पोलिस दलाच्या 200 सी-60 कमांडो आणि छत्तीसगड पोलिसांच्या ७० डीआरजी कमांडोंनी संयुक्तपणे ही कारवाई केली. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील भोपालपटनम् जवळच्या बारेगुडा जंगलात नक्षलवाद्यांचा कॅम्प लागलेला असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी याबाबतची माहिती बिजापूर पोलिसांना दिल्यानंतर ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.

या चकमकीनंतर पोलिसांनी राबविलेल्या शोध मोहिमेत नक्षलवाद्यांकडील स्फोटके, डिटोनेटर, जिलेटिन स्टिक, पिट्टू बॅग, टेंट लावण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. अर्धा तासपर्यंत दोन्ही बाजुने फायरिंग सुरू होती, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.