किन्हाळा मोहटोल्यातील रात्रकालीन कबड्डी स्पर्धेत उतरले अनेक संघ

'स्पर्धांमधून राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत'

देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा मोहटोला येथे रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आणि आ.कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात झालेल्या या स्पर्धेत अनेक संघ उतरले आहेत. स्वराज्य क्रीडा क्लबच्या वतीने आयोजित या कबड्डीच्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील अनेक गावकरी हजेरी लावत आहेत.

मैदानी खेळाने शारीरिक व्यायाम होतो. त्यामुळे आपले शरीर मजबूत बनते. सदर कबड्डी स्पर्धा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित न ठेवता आपल्याला प्रो-कबड्डीमध्ये जाता येईल या दृष्टीने वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी आ.कृष्णा गजबे यांनी केले. ज्याप्रमाणे अभ्यास करतो त्याचप्रमाणे आपण खेळांमध्येही अव्वल असलो पाहिजे. काही विद्यार्थ्यांची प्रगती ही अभ्यासाने होते, तर काहींची खेळाने. गडचिरोली जिल्ह्यातील दोन मुलांनी प्रो कबड्डीमध्ये स्थान मिळविले आहे. अशा स्पर्धांमधून राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मंचावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, माजी सभापती नाना नाकाडे, यादव ठाकरे, रामदास मसराम, सरपंच श्रीमती श्रीरामे, उपसरपंच डोनाडकर, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, भाजपचे वसंता डोनाडकर, परसराम ठाकरे, नितिन राऊत, गोपाल उईके, परसराम टिकले, भाजपचे प्रमोद झिलपे, तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.