गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर बुधवार, दि.20 पासून निवडणुकीच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांना नामांकन अर्जांची विक्री करण्यासही सुरूवात झाली. गेल्या दोन दिवसात ईच्छुकांनी 47 नामांकन अर्जांची खरेदी केली, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अद्याप एकही नामांकन दाखल झालेले नाही. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. शनिवार ते सोमवार असे तीन दिवस सुट्या असल्यामुळे शेवटच्या दोन दिवसात, अर्थात मंगळवार आणि बुधवारी (दि.27) नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या सुट्या रद्द करत त्यांना परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे निर्देश दिले आहे. प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व सोपविलेली जबाबदारी गांभिर्याने आणि काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. निवडणुकीच्या प्रक्रियेत सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे (कुरखेडा), गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जि.प.चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकूर यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
याशिवाय लोकसभा मतदार संघातील सहा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. त्यात सहायक जिल्हाधिकारी तथा एसडीओ राहुल मीना (गडचिरोली), मानसी (देसाईगंज), आदित्य जीवने (अहेरी), किशोर घाडगे (चिमूर), संदीप भस्के (ब्रह्मपुरी), डॉ.रवींद्र होळी (आमगाव) यांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रियेत विविध बाबींसाठी परवानगी देताना सर्व उमेदवारांना समान न्याय मिळेल या दृष्टीने निर्णय घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना द्यावयाच्या एकूण तीन प्रशिक्षणासाठी नियोजित तारखा ठरवण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच निवडणूक साहित्याचे हस्तांतरण, टपाल मतपत्रिकेचे वाटप, निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना द्यावयाच्या विविध परवानग्या, मतदान केंद्र व ईव्हीएम सुरक्षा कक्षाची सज्जता, निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त तक्रारींचे निराकरण, 85 वर्षांवरील जेष्ठ मतदार, दिव्यांग मतदार, अत्यावश्यक सेवेतील मतदार, निवडणूक कर्तव्यावर नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना मतदान करण्यासाठी टपाली मतपत्रिका वितरणाचे नियोजन, निवडणूक उमेदवारांचे प्रचाराचे चित्रिकरण करण्यासाठी व्हिडिओग्राफरचे प्रशिक्षण, वाहनांचे नियोजन, निवडणूक निरीक्षक तसेच मतदान पथकातील अधिकारी यांना मतदान केंद्र व प्रशिक्षण केंद्र येथे उपलब्ध करावयाच्या सुविधा, मतदानाची टक्केवारी 75 टक्केपेक्षा अधिक साध्य करण्याबाबत नियोजन आदी बाबींचाही आढावा घेण्यात आला.
दरम्यान लोकसभा क्षेत्रांतर्गत राजकीय पक्षांची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी दत्तात्रय खरवडे, सुनील चडगुलवार, अनुप कोहळे, वासुदेव शेडमाके व इतर प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती दिली. काय करावे व काय करू नये याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
बँकेतील संदिग्ध व्यवहारांवर राहणार नजर
निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या बँकेतील व्यवहारांवर यंत्रणेची नजर राहणार आहे. निवडणूक कामाचा सर्व खर्च करण्यासाठी उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकत नवीन खाते काढावे लागणार आहे. बँकेतील १० लाखांवरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ माहिती द्यावी लागेल. बँकेची रक्कम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा, तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.
सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध
नगर पालिका, नगर पंचायत व ग्रामीण भागात निवडणुकीच्या कालावधीमध्ये होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी कालावधी संपल्यानंतर ते जाहीरात फलक काढून इमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निर्बंध लावण्यात आले आहे.
तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या परिसरात तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे, मेळाव्यांचे आयोजन करण्यावर निवडणूक कालावधीत निर्बंध राहणार आहेत.
वाहनावर कापडी फलक, झेंडे लावण्यावर निर्बंध
निवडणूक प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी बंधन राहील. यानुसार फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंडस्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावे, ईतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. तसेच फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.
नामनिर्देशन दाखल करताना ही काळजी घ्या
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी जाताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त वाहने नसावीत. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे , वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध राहणार आहे.