ओबीसींच्या हक्कांसाठी हजारो कुणबी, ओबीसी बांधव उतरले रस्त्यावर

महामोर्चाने दणाणून गेले गडचिरोली

गडचिरोली : राज्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात वाटा देऊ नये, ओबीसींची जनगणना करावी, यासह इतर मागण्यांसाठी गुरूवारी गडचिरोलीत कुणबी महामोर्चाचे आयोजन केले होते. शिवाजी महाविद्यालयापासून निघालेला हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर तिथे जाहीर सभेत रूपांतर झाले. १५ हजारांवर नागरिकांच्या महामोर्चाने गडचिरोली शहर दणाणून गेले.

मोर्चाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदन देताना आणि मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार परिणय फुके, आमदार कृष्णा गजबे, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोराकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह माजी आमदार डॅा.रामकृष्ण मडावी, आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॅा.नामदेव किरसान, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जाहीर सभेच्या मंचावर कोणीही नेते चढले नाही. अनिल देशमुख हेसुद्धा मोर्चेकऱ्यांमध्ये खाली बसले होते. कुणबी समाजातील युवक आणि काही शाळकरी मुलींनीही यावेळी परखडपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने कुणबी आणि ओबीसी समाजबांधव सहभागी झाले होते.