विदेशात उच्चशिक्षण घ्यायचे? ओबीसींना शिष्यवृत्तीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

बहुजन कल्याण विभागाच्या योजनेनुसार 50 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

गडचिरोली : इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी किंवा संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. यावर्षी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. त्याला आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या बहुजन कल्याण विभागामार्फत दरवर्षी 50 विद्यार्थ्याना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील इमाव व विजाभज प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी अद्ययावत जागतिक क्रमवारीत 200 च्या आतील परदेशी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 50 विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. सदर परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक कागदपत्रांसह, संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, 3 चर्च पथ, पुणे – 411001 या पत्यावर सादर करायचे आहेत.

सदर योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडी साठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रम या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डॉ.डी.डी. डोके (पुणे), तसेच प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे (नागपूर) यांनी केले आहे.