आ.धर्मरावबाबा यांचा भूमिपूजनाचा धडाका, अंकिसा परिसरात मागणीनुसार कामे

मंदिरासह रस्ता, शाळेच्या बांधकामांना प्राधान्य

सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रात आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून विविध कामांचा धडाका सुरू केला आहे. त्यात तालुक्यातील अंकिसा येथे स्थानिकांच्या मागणीनुसार मंदिरांसह विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

अंकिसा येथे समक्का सारक्का मंदिराच्या बांधकामासाठी आमदार विकास निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच या ठिकाणी सिमेंट रस्त्याचेही बांधकाम होणार असून त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मौजा राघवरावनगर येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोलीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सर्व कामांचे धर्मरावबाबा यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

अंकिसा येथील विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी सरपंच सरिता सुदर्शन पेद्दी, उपसरपंच सतीश चिप्पा, प्रभाकर शानगोंडा, महेश कंती, मोहन मेचीनेनी, प्रवीण आकुला, सतीश आकुला, बापू रालाबंडी, समय्या पांडवला आदी प्रामुख्याने उपस्थित होते.