कुंमकोटच्या मंडईत पंचक्रोशीतल्या 60 गावांमधील भाविकांची गर्दी

आजी-माजी आमदार एका मंचावर

कोरची : अनेक वर्षांच्या परंपरेनुसार तालुक्यातील कुंमकोट येथे 8 जानेवारीला झालेल्या राजदेव मंडईत पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राजमातेसह इतर देवीदेवतांच्या पुजनामुळे या मंडईला वेगळा मान असून ही मंडई झाल्यानंतरच परिसरातील इतर गावांमध्ये मंडईचे आयोजन केले जाते. यावेळी आजी-माजी आमदारद्वय एका मंचावर होते.

या मंडईसाठी 60 गावांमधील पुजारी एकत्र येतात. हातात संकल, त्रिशूल, बांबूचे झेंडे पकडून मंडईच्या सभोवताल तीन फेरे मारले जातात. त्यानंतर पुजेची सांगता होते. हे फेरे बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. कोरची तालुक्यातील बहुतांश गावे छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहेत. त्यामुळे या गावांमधील नागरिकांवर आदिवासी संस्कृतीबरोबर छत्तीसगडी संस्कृतीचा प्रभाव आहे. मंडईनंतर रात्री छत्तीसगडी लोककला नृत्याचे आयोजन करण्यात आले. या नृत्याच्या माध्यमातून रात्रभर नागरिक मनोरंजनाचा आनंद घेतात.

या मंडईत देवतांचे पूजन व दीप प्रज्वलन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रामदास मसराम तर प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी, गटशिक्षणाधिकारी अमित दास, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, प्राचार्य देवराव गजभिये, माजी सदस्य जि.प. सदस्य प्रमिला काटेंगे, नगरसेवक मेघश्याम जमकातन, गोंड समाजाचे तालुकाध्यक्ष रामसुराम काटेंगे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, आनंद चौबे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मंडईमध्ये खेळणी, झुले, कपडे, भाजीपाला, प्रसाद आदी विविध प्रकारची दुकाने लावली होती. दोन वर्षानंतर भाविकांच्या गर्दीने कुंमकोट गावाचा परिसर फुलून गेला होता. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष राहुल अंबादे यांनी केले तर संचालन सीताराम होळी, विलास होळी आणि आभार आयोजन समितीचे अध्यक्ष सदाराम नुरूटी यांनी मानले.