सेक्शन कमांडर श्यामलासह काजलचे आत्मसमर्पण, दोघींवर 10 लाखांचे इनाम

आठवडाभरात 13 नक्षलवादी घटले

गडचिरोली : राज्य शासनाचे 8 लाखांचे इनाम असलेल्या कंपनी क्र.10 ची सेक्शन कमांडर श्यामला झुरू पुडो उर्फ लिला आणि 2 लाखांचे इनाम असलेली भामरागड दलम सदस्य काजल मंगरू वड्डे उर्फ लिम्मी यांनी बुधवारी नक्षल चळवळीचा त्याग करत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. नवीन वर्षाच्या आठवडाभरात आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या 13 झाली आहे.

गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर त्यांनी अहेरीच्या प्राणहिता उपमुख्यालयात हे आत्मसमर्पण केले. श्यामला (36 वर्ष) ही गट्टेपल्ली (ता.एटापल्ली) येथील रहिवासी असून ती 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या चकमकीत मारल्या गेलेल्या डिकेएसझेडसीएम रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. 2002 मध्ये ते चामोर्शी दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाली होती. तिच्यावर आजपर्यंत एकुण 45 गुन्हे दाखल आाहेत. त्यामध्ये 21 चकमक, 6 जाळपोळ आणि 18 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

काजल (24 वर्ष) ही नेलगुंडा (ता.भामरागड) येथील रहिवासी आहे. जानेवारी 2018 मध्ये ती भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत होती. तिच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 4 चकमक, 1 जाळपोळ आणि 3 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

आत्मसमर्पित होण्याची कारणे

गडचिरोली पोलिसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठिण झाले होते. नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही. चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला ठार मारल्या जातात. खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडून स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते. दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून श्यामला झुरु पुडो ऊर्फ लीला हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी हिला 4.5 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.

ही आत्मसमर्पणाची कारवाई पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान)संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, 113 बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.