आंबेशिवनीतील नियमबाह्य वन व्यवस्थापन समितीप्रकरणी वनरक्षक दुर्गे निलंबित

उपसरपंच कुडवे यांच्या उपोषणाचे यश

गडचिरोली : आंबेशिवनी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करताना ग्रामसभेची परवानगी न घेता नियमबाह्यपणे समिती स्थापन करून आपल्या मर्जीतील लोकांना त्या समितीमध्ये घेणाऱ्या, याशिवाय समितीच्या नावाने बँकेत खाते तयार करून त्यात शासकीय रक्कम जमा करणाऱ्या वनरक्षक राजेश दुर्गे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली. या मागणीसाठी आंबेशिवनीचे उपसरपंच योगाजी कुडवे आणि इतर काही लोकांनी वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण केले होते. सदर निलंबनाचा आदेश मिळाल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

२५ लाखांच्या रकमेतून साहित्य खरेदी करण्याचा प्रयत्नही वनरक्षक दुर्गे यांनी केला होता. चेकवर सह्या करून दुकानदाराच्या नावाने चेक देण्याचाही प्रयत्न झाला. पण वेळीच ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने दुर्गे यांचा डाव उधळल्या गेला. दरम्यान उपवनसंरक्षकांनी ती नियमबाह्य समिती रद्दही केली. पण या पद्धतीने काम करणाऱ्या दुर्गे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी कुडवे यांच्यासह इतरांनी 5 ऑक्टोबरपासून वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. यादरम्यान ढोल बजाओ, अर्धनग्न आंदोलनही करण्यात आले. अखेर सोमवारी बाराव्या दिवशी निलंबनाची कारवाई झाली.

या आंदोलनात रवींद्र सेलोटे, आकाश मट्टामी, नीलकंठ संदोकर, चंद्रशेखर सिडाम, विलास भानारकर, विलास धानफोले, रवींद्र धानफोले, अमोल झंजाळ, सुनील बाबनवाडे, मोतीराम चंद्रगिरे, मुरली गोडसुलवार, तुळशीराम मेश्राम, दिलीप झंजाळ, रघुनाथ सिडाम आदी उपस्थित होते.