गडचिरोली : जिल्हयात ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत संवाद यात्रा काढली जाणार आहे. त्यासाठी जिल्हयातील तीन नद्यांची निवड केली असून त्यात कठाणी, खोब्रागडी (सती नदीपासून) आणि पोहार पोटफोडी या नद्यांचा समावेश आहे. नदीला जाणून घेणे व तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2022 रोजी सेवाग्राम येथून झाली असून राज्यभरातील 75 नद्यांवर नदी संवाद यात्रा संपन्न होणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातून वाहणाऱ्या निवडक नद्यांबाबतची माहिती, त्यांचा प्रचार, प्रसार व इतर बाबींसाठी सहाय्य करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. दर महिन्याला या समितीची बैठक होईल. यानुसार गडचिरोलीत पहिल्या बैठकीचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या नावीन्यपूर्ण योजनांसाठी मंजूर तरतुदीच्या 10 टक्के मर्यादेपर्यंत विशेष बाब म्हणून निधी खर्च करता येणार आहे. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे , तहसीलदार महेंद्र गणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक संदीप कऱ्हाळे, उपअभियंता संतोष वाकोडे, उपअभियंता उपअभियंता, नदी समन्वयक डॉ.सतीश गोगुलवार, प्रकाश अर्जूनवार, मनोहर हेपट तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भू-पृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये, जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता व साठवण क्षमता कमी झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी जनजागृती अभियान राबविले जात असून त्यासाठी ही संवाद यात्रा निघणार आहे. यासाठी आवश्यक निधीकरीता सविस्तर प्रस्ताव व आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले.
काय आहे या अभियानाचे उद्दिष्ट?
नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरीकांच्या सहकार्याने नदीचा सर्वंकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे, अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसाराची रुपरेषा आखणे, नदीचा तट, प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्हयात प्रचार-प्रसार याबाबत नियोजन करणे, नदी खोल्यांचे नकाशे, नदीची पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी याबाबतची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे, अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे, नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे, नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे आदी उद्दिष्ट सांगण्यात आले.