पोलीस दादांनो, दारूपासून दूरच राहा

मद्यमुक्ती सेमिनारच्या माध्यमातून केली पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जागृती

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरीही अनेकांना दारूचे व्यसन आहे. आपली गरज भागवण्यासाठी ते दारूच्या अड्ड्यांचा शोधही बरोबर लावतात. पोलीस विभागातील काही अधिकारी-कर्मचारीही त्यासाठी अपवाद नाहीत. परंतू दारू मिळते म्हणून ती घेणे चुकीचे असून दारूच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवण्यातच स्वतःचे आणि कुटुंबियांचे, पर्यायाने समाजाचे हित आहे, ही बाब एका सेमिनारच्या माध्यमातून पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न शुक्रवारी (दि.२) करण्यात आला.

मद्यमुक्ती सेमिनार या नावाने पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य हॅालमध्ये झालेल्या या शिबिराचे आयोजन अल्कोहोलिक्स अॅनानिमस आंतरसमुह गडचिरोली या संघटनेच्या वतीने केले होते. यात २०० पोलीस अधिकारी-अंमलदारांनी हजेरी लावली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी दारूचे दुष्परिणाम स्वतःच्या अनुभवातून कथन केले. हे व्यसन कशा पद्धतीने शारीरिक, मानसिक व आर्थिक अधोगतीकडे घेऊन जाते आणि व्यक्तीची कौटुंबिक, सामाजिक दुर्दशा कशी होते हे यावेळी सांगण्यात आले.

हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, यतीश देशमुख (अहेरी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (गृह) अजय अहीरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अल्कोहोलिक्स अॅनानिमस संघटनेचे संजय जे, जीवन एम, लक्ष्मण टी, प्रभाकर बी व इतर सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.