Home दैनंदिन बातम्या महाराजस्व समाधान शिबिरातून 1,116 लाभार्थ्यांना सेवांचा लाभ

महाराजस्व समाधान शिबिरातून 1,116 लाभार्थ्यांना सेवांचा लाभ

गडचिरोलीत सेवा संकल्प अभियान

लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करताना एसडीओ अरुण एम., सोबत तहसीलदार सागर कांबळे

गडचिरोली : सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोली येथील नगर परिषद सभागृहात शुक्रवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ पार पडले. या शिबिरात विविध विभागांमार्फत 1,113 लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप व विविध सेवांचा लाभ देण्यात आला. (खाली वाचा)

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, तक्रारी तातडीने निकाली काढणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करणे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम. यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर झाले.

शिबिरात तहसील कार्यालय, नगर परिषद, तालुका कृषी कार्यालय, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी लीलाधर बेडके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदुरकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख योगेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया कळंबरकर, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर ठाकरे व शाहीद शेख तसेच पुरवठा निरीक्षक वैशाली आंबेकर उपस्थित होते.

शिबिराच्या आयोजनासाठी मंडळ अधिकारी निशाली मेश्राम, आर.एस. गोरेवार, पी.एम. धात्रक, के.एल. लेनगूरे, एस.के. खोब्रागडे, तसेच एच.एम. उईके व जयेश भैसारे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ग्राम महसूल अधिकारी अरविंद शेंडे यांनी, तर ग्राम महसूल अधिकारी आर.एम. वासनिक यांनी आभार मानले.