छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करा

जिल्हाधिकारी संजय मीना यांचे आवाहन

गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती विविध कार्यक्रमांनी जिल्हाभर मोठ्या उत्साहात आणि शांततेने साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले आहे.

शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष सर्वत्र साजरे केले जात आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षीची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटना, शैक्षणिक संस्थांनी देखील आपल्यास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करावी. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, तो परिसर स्वच्छ, सुंदर करावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, रांगोळी काढावी. महाराजांचा पुतळा व परिसर स्वच्छ करावा.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यगीत वाजविण्यात यावे. कार्यक्रमाच्या अगोदर व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेता येत असल्यास अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. शाळांनी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.