कोलकात्याच्या दिव्यांनी गडचिरोलीकरांना घातली भुरळ, महाग असूनही पसंती

कसे आहेत हे दिवे, पहा एक झलक

गडचिरोली : दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. लायटिंग आणि मोठमोठ्या विद्युत दिव्यांनी घर उजळून निघत असले तरी तेलाच्या दिव्यांचे खास महत्व कायम आहे. त्यामुळे विविध प्रकारचे आकर्षक दिवे (पणत्या) गडचिरोलीत विक्रीसाठी आल्या होत्या. यात स्थानिक कुंभारांनी बनविलेल्या साध्या मातीच्या दिव्यांपेक्षा विशिष्ट छाप्यांमध्ये तयार झालेल्या कोलकात्याच्या शाडूच्या दिव्यांनी नागरिकांना सर्वात जास्त भुरळ घातली. दिसायला आकर्षक असलेल्या या दिव्यांच्या झगमगाटाने लक्ष्मीपुजनाला अनेकांची घरे उजळून निघाली.

गेल्या आठवडाभरापासून दिवाळीच्या खरेदीची धूम सुरू होती. या खरेदीत मातीच्या दिव्यांची खरेदी ही अत्यावश्यक असते. त्यामुळे गडचिरोलीत चंद्रपूर मार्गावरील पोलिस स्टेशन समोरील परिसरात दिवे विक्रेते आपले दुकान लावून बसले होते. स्थानिक कुंभार बांधवांकडून बनविल्या जाणारे पारंपरिक दिवेही त्यात होते. पण यावर्षी कोलकाता पॅटर्नच्या दिव्यांची क्रेझ नागरिकांमध्ये वाढल्याचे दिसून आले.

विविध आकाराच्या आणि विविध रंगांनी सजविलेल्या शाडूच्या मातीच्या या दिव्यांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे. यासोबत चिनी मातीच्या दिव्यांच्या खरेदीलाही महिलावर्गाने पसंती दिली. साध्या दिव्यांपेक्षा या दिव्यांची किंमत जास्त असतानाही या दिव्यांची खरेदी जोरात झाली.

(विविध मान्यवरांच्या दिवाळी शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)