गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे छत उडून बरेच नुकसान झाले, तर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.
दि.6 च्या रात्री आणि दि.7 ला दुपारी आणि संध्याकाळी पुन्हा वादळी पाऊस झाला. त्यात एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातही काही भागात या वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर गडचिरोली शहरातही पावसाच्या हलक्या सरी आल्या. सोमवारच्या रात्री भामरागड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मलमपोदूर येथे घरावरील छत उडाले. झाडे कोसळल्याने वीजवाहक ताराही तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. अहेरी ते कोटी ही कोटीला गेलेली बस दि.7 ला सकाळी परतू शकली नाही. कारण रात्रीच्या पावसाने रस्त्यावर झाड कोसळले असल्याने मार्ग बंद झाला होता. एटापल्ली शहरात आठवडी बाजाराला फटका बसला. मुलचेरा तालुक्यातही मंगळवारी वादळाचा तडाखा बसला. ठाकूरनगर येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.