देसाईगंज : आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य देशातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ते आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सात दिवसीय रासेयो शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या शिबिराच्या माध्यमातून मतदार जागृतीसह रस्ता सुरक्षा आणि श्रमसंस्कार घडविले जाणार आहेत.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, नुतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंजचे उपाध्यक्ष जगदीश शर्मा, मंडळाचे सचिव मोतीलाल कुकरेजा, देसाईगंजचे पोलिस निरीक्षक किरण रासकर, एकलपूरच्या सरपंच वनश्री भागडकर, सदस्य अ.जहीर शेख, प्रा.दामोदर सांगोडे, उद्धव तलमले, प्रा.डॉ. शंकर कुकरेजा, प्रा.निलेश हलामी आदी उपस्थित होते.
युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय, असे आ.गजबे यावेळी म्हणाले. शिक्षण क्षेत्रातून तरुणांवर सेवासंस्कार व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.