गडचिरोली : काँग्रेस पक्षाने काही दिवसांपूर्वी राबवविलेल्या संघटन सृजन अभियानानंतर राज्यातील 23 जिल्हाध्यक्षांची खांदेपालट करण्यात आली. त्यात गडचिरोली जिल्हा काँग्रेसची धुरा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजित मारोतराव कोवासे यांच्याकडे देण्यात आली. यामुळे मावळते जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या समर्थकांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटत आहे.
ब्राह्मणवाडे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून चार वर्ष पक्षाचे नेतृत्व केले. यादरम्यान लोकसभा निवडणुकीसह आरमोरी विधानसभा क्षेत्रातही काँग्रेसला यश मिळाले. याशिवाय वेळोवेळी सरकारविरोधी आंदोलने करून पक्षाचे अस्तित्व दखलपात्र बनविले. असे असताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे नेतृत्व का डावलले, असा सवाल त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे. या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात पक्षाच्या वरिष्ठांना यश येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.
विश्वजित कोवासे हेसुद्धा ब्राह्मणवाडे यांच्याप्रमाणे तरुण आहेत. त्यामुळे वेळोवेळी आक्रमक भूमिकांमधून पक्षाला उभारी देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. याशिवाय आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला जुने वैभव मिळवून देण्यात त्यांना यश येईल का, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
































