जिल्ह्यातील तीन मतदार संघांपैकी अहेरीत मतदारांची ‘नोटा’ला जास्त पसंती

3.13 टक्के मतदारांनी नाकारले

गडचिरोली : जिल्ह्यातील चर्चेतील लढत असलेल्या अहेरी मतदार संघात यावेळी तब्बल 3.13 टक्के मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारले आहे. या मतदार संघात मतदान करणाऱ्यांपैकी 5825 लोकांनी नोटा, अर्थात ‘यापैकी कोणीही नाही’ या पर्यायावरील बटन दाबत सर्व उमेदवारांबद्दलची नापसंती व्यक्त केली.

निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसल्यास ‘नोटा’, अर्थात वरीलपैकी एकही उमेदवार नाही, हा पर्याय निवडण्यासाठी ईव्हीएम मशिनवर सर्वात खाली नोटा हा पर्याय दिलेला असतो. तीनही मतदार संघात नागरिकांनी ‘नोटा’ला मतदान करून रिंगणातील उमेदवारांपैकी एकही पसंत नसल्याचे दर्शविले आहे. मात्र त्यात आरमोरी मतदार संघात 0.87 टक्के मतदारांनी, तर गडचिरोली मतदार संघात 1.22 टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

सर्वाधिक 12 उमेदवार रिंगणात असलेल्या अहेरी क्षेत्रात मात्र सर्वाधिक 3.13, म्हणजे 5825 मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.