गडचिरोली : विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दलांच्या जवानांसोबत घातपात घडवून त्यांची शस्रे लुटण्यासाठी जमिनीत स्फोटके पेरून ठेवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव उघडकीस आला होता. या गुन्ह्यातील एका आरोपीला शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले.
भामरागड आणि ताडगावला जोडणाया पर्लकोटा नदीवरील पुलावर नक्षलवाद्यांनी काही स्फोटके (बॅाम्ब) पेरून ठेवली होती. दि.16 नोव्हेंबर रोजी पोलिसांच्या सतर्कतेने ही बाब निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बॅाम्ब शोधक व नाशक पथकाच्या सहाय्याने सदर स्फोटकांचा शोध लावून ती घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आली. याप्रकरणी भामरागड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान सदर घटनेमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका इसमास 24 नोव्हेंबरला अटक करण्यात यश आले.
या गुन्ह्रातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तहेर यंत्रणा तीव्र करण्यात आली होती. त्यानुसार भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांना विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, सदर गुन्ह्रात प्रत्यक्ष सहभाग असलेला आरोपी पांडू कोमटी मट्टामी (35 वर्षे), रा.पोयारकोटी, ता.भामरागड हा भामरागड जंगल परिसरात फिरत असल्याचे समजले. त्यावरुन पोउपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या नेतृत्वात भामरागड ठाण्याचे पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी आरेवाडा रोडवर नाकाबंदी करून त्याला पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते, भामरागडचे प्रभारी अधिकारी पोनि. दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.