गोंडवाना विद्यापीठातर्फे बुधवारपासून दोन दिवस युवा साहित्य संमेलन

सकाळी ग्रंथदिंडीने होणार सुरूवात

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने २१ व २२ फेब्रुवारी रोजी शहरातील आरमोरी मार्गावरच्या सुमानंद सभागृहात युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॅा.किशोर कवठे हे राहणार आहेत. या संमेलनाची सुरूवात बुधवारी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे.

सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन ९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, तर विशेष अतिथी म्हणून डॉ.अभय बंग, प्रमुख अतिथी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, यवतमाळचे साहित्य अभ्यासक प्रा.ज्ञानेश्वर गटकर, बांबू प्रशिक्षक मिनाक्षी वाळके उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे सांभाळत आहेत.

या संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, मराठी विभागाचे समन्वयक तथा रासेयो संचालक डॉ.श्याम खंडारे, युवा साहित्य संमेलनाच्या समन्वयक प्रा.डॉ.सविता गोविंदवार, सहसमन्वयक प्रा.डॉ.हेमराज निखाडे, प्रा. डॉ.नीळकंठ नरवाडे, प्रा.अमोल चव्हाण आदींनी केले आहे.

या दोन दिवसीय संमेलनात नऊ सत्र होणार असून विविध मान्यवर या सत्रांमध्ये विचार व्यक्त करणार आहेत. या युवा साहित्य संमेलनाचा समारोप दि.२२ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. यावेळी अध्यक्ष डॉ.किशोर कवठे, स्वागताध्यक्ष डॉ.प्रशांत बोकारे, विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, प्रमुख अतिथी म्हणून अड्याळ टेकडीचे सुबोध दादा, पत्रकार श्याम हेडाऊ, प्रसिद्ध वक्ते तथा लेखक डॉ.अनमोल शेंडे उपस्थित राहणार आहेत.