सरकारविरोधात विरोधकांचा एल्गार, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

नारेबाजी करत कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर निवेदन

गडचिरोली : संयुक्त किसान मोर्चा व कामगार कृती समितीने केंद सरकारच्या धोरणांविरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ गडचिरोलीत शुक्रवारी इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी राजकीय पक्ष, शेतकरी, कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्या करत सरकारविरोधात नारेबाजी करण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.

धार्मिक, जातीयवादी, भांडवलदारांना फायदा व्हावा यासाठी गरिबांच्या विरोधात कायदे करून आवाज दडपण्याचा सपाटा चालविला आहे. त्यामुळे जनतेने न्याय मिळविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या सरकारला हद्दपार करावे, असे आवाहन विरोधकांनी धरणे आंदोलनादरम्यान केले.

धरणे आंदोलन सभेच्या अध्यक्षस्थानी भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.महेश कोपूलवार होते. यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते रमेश दहिवडे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जयश्री जराते, शामसुंदर उराडे, बीआरएसपीचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, भाकपचे जिल्हा सचिव देवराव चवळे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रमेश चौधरी, भरत येरमे, जावेद पठाण, राष्ट्रवादीचे इंद्रपाल गेडाम, प्रमिला रामटेके, संजय कोचे, कामगार संघटनेचे लतीफ पठाण, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, डॉ.साईनाथ कोडापे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी शेतकरी, कामगारांसह विविध स्थानिक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि शेतमजूर महिलांची उपस्थिती होती.