बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या उमेदवाराचे वाजतगाजत नामांकन

शेतकरी कामगार पक्षाचेही पाठबळ

गडचिरोली : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाकडून निवृत्त डीवायएसपी बारीकरावजी धर्माजी मडावी यांनी लोकसभेसाठी नामांकन दाखल केले. इंदिरा गांधी चौकातून वाजतगाजत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून हे नामांकन दाखल करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षासह काही आदिवासी संघटनांनीही त्यांना पाठिंबा दर्शवत रॅलीमध्ये सहभाग घेतला.

विशेष म्हणजे 22 मार्च रोजी बीआरएसपीकडून विनोद गुरूदास मडावी यांनी नामांकन अर्ज दाखल केला असताना पुन्हा दुसरा अर्ज दाखल झाल्यामुळे या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

यावेळी बीआरएसपीचे प्रदेश महासचिव संजय मगर, गडचिरोली जिल्हा प्रभारी राज बनसोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे, तसेच शेकापचे रामदास जराते, महिला नेत्या जयश्री जराते प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच महासचिव पुरुषोत्तम रामटेके, उपाध्यक्ष अरविंद वाळके, विनोद मडावी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सविता बांबोळे, शहर अध्यक्ष विद्या कांबळे, सचिव रेखा कुंभारे, प्रफुल रायपुरे, संघरक्षित बांबोळे, मित्र पक्षांचे कार्यकर्ते व शेकडो समर्थक उपस्थित होते.