गडचिरोली-चिमूर मतदार संघात बसपाच्या एन्ट्रीने बदलू शकतात राजकीय समिकरणे

जिंकण्यासाठीच उतरलोय मैदानात- गोन्नाडे

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात रिंगणात असलेल्या 10 उमेदवारांपैकी तीन उमेदवार राष्ट्रीय पक्षांचे आहेत. त्यात भाजप-काँग्रेस, अर्थात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना बहुजन समाज पार्टीने (बसपा) एंट्री करत ‘हत्ती’ची चाल खेळली आहे. त्यामुळे हा हत्ती राजकीय समीकरणे बदलू शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बसपाकडून प्राचार्य योगेश गोन्नाडे यांनी नामांकन दाखल केल्यानंतर शनिवारी त्यांनी रिंगणात कायम राहात बसपाचा हत्तीही मिळवला. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पूर्वी शिवसेनेत सक्रिय असलेल्या प्राचार्य गोन्नाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना या लोकसभा क्षेत्रातील शेतकरी, आदिवासी, ओबीसींचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे सांगितले. या आदिवासी जिल्ह्यासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे जातो, वर्षानुवर्षे विकास कामे का झाली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझे सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे मला सर्वांची मदत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्रपरिषदेला गोपाल खांबाडकर, डॅा.चांगदेव शेंडे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट, सोमा धारणे, अनिल साखरे, महिला अध्यक्ष माया मोहर्ले, वेणूताई खोब्रागडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वंचितला पर्याय बनून बसपाचे आव्हान

वास्तविक या मतदार संघात गेल्या लोकसभा निवडणुकीत (2019) वंचित बहुजन आघाडीचे डॅा.रमेशकुमार गजबे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. डॅा.गजबे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय होते. मोठ्या प्रमाणात असलेल्या माना समाजाचे ते प्रतिनिधीत्व करत असल्याने त्याचाही त्यांना फायदा झाला होता. त्यामुळे त्यांना मिळालेल्या मतांमध्ये पक्षापेक्षा त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क जास्त महत्वाचा ठरला होता.

यावेळी मात्र तशी परिस्थिती नसून वंचितचा उमेदवारही अपरिचित आहे. याउलट बसपाने प्राचार्य गोन्नाडे यांना उमेदवारी देऊन माना समाजाला खुश केले. बसपातील कॅडरची मतेही त्यांना मिळतील. याशिवाय गोन्नाडे यांच्या वैयक्तिक संबंधातून मिळणारी मतेही त्यांच्यासाठी फायदेशिर ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे बसपाने वंचितसह बीआरएसपीलाही पर्याय दिला असल्याचे बोलले जाते. आता बसपा कुठपर्यंत मजल गाठते हे लवकरच दिसेल.