आत्मसमर्पित नक्षलवादी गिरीधरच्या भूमिकेवर नक्षल प्रवक्ता श्रीनिवासची पत्रकातून आगपाखड

पळपुटा असल्याचे म्हणत दिला इशारा

गडचिरोली : जहाल नक्षल नेता गिरीधर व त्याच्या पत्नीने नक्षल चळवळीतून बाहेर पडत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मार्पण केल्याने नक्षल चळवळीत खळबळ माजली आहे. नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रक जारी करत आत्मसमर्पण करणारा गिरीधर ‘भगोडा’, अर्थात पळपुटा असल्याचा उल्लेख करत जनता त्याला माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.

नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य असलेल्या नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी ललितासह शनिवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले. त्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे फडणवीस म्हणाले होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे नक्षल चळवळीला मोठे हादरे बसत आहे. दरम्यान नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने जारी केलेल्या पत्रकात अनेक मुद्द्यांचा उल्लेख करत आपला संताप व्यक्त केला आहे.