गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांवर विधानमंडळात प्रश्न उपस्थित करा

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे विरोधीपक्ष नेते दानवे यांना साकडे

गडचिरोली : अतिदुर्गम आणि मागास अशा गडचिरोली जिल्ह्यात वर्तमान स्थितीत महाविकास आघाडीचा एकही लोकप्रतिनिधी नाही. सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या प्रश्नांना बगल दिल्या जाते. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्याकरिता सभागृहात येथील प्रश्न मांडा, अशी विनंती गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, तसेच आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे केली.

यावेळी दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने सुरजागड वाहतुकीमुळे झालेली रस्त्यांची दुरवस्था व त्यामुळे होत असलेले अपघात, तलाठी आणि वनरक्षक भरतीत गैरआदिवासी समाजावर झालेला अन्याय, निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर घेण्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची हुकलेली संधी, जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती घेणे, मेडिगड्डा धरणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पावले उचलणे, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीअभावी अधिकाऱ्यांचा सुरू असलेला मनमर्जी कारभार याकडेही सरकारचे लक्ष केंद्रित करण्याची मागणी ब्राह्मणवाडे यांनी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा

मेडिगट्टा धरणाच्या बॅकवॉटरमुळे वैनगंगा, प्राणहिता, वर्धा, पर्लकोटा आणि जिल्ह्यातील इतर लहानमोठ्या नद्यांना आजपर्यंत कधीही न आलेल्या भयंकर पुराचा सामना गेल्यावर्षीपासून करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकरी या संकटामुळे हवालदिल झाला आहे, मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरूकूनही पाहिले नाही. त्यामुळे सक्रिया पालकमंत्री देण्यासोबत नुकसानग्रग्स्तांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.