गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वाघ आणि जंगली हत्तींमुळे शेतातील पिकांसोबत जीवित हाणीसुद्धा होत आहे. श्वापदांना रोखण्यासाठी झटका मशिनची, अर्थात शेतात येऊ पाहणाऱ्या प्राण्यांना सौम्य करंट देणारे सौरकुंपण घालण्याची योजना वनविभागाकडे आहे. पण जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी निधीच दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणविस यांना गडचिरोलीच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसेल तर त्यांनी पालकमंत्रीपद दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवावे, अशी मागणी काँग्रेसचे गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.
गडचिरोलीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी, तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सुरजागडमधील लोहप्रकल्प, लोहवाहतुकीच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना या कामाला आपला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाला लोखंडाची गरज आहे. मात्र स्थानिक बेरोजगारांना या प्रकल्पात प्राधान्य द्यावे. लोहवाहतुकीसाठी रस्ते खराब असल्याने पर्यायी मार्ग किंवा स्पेशल कॅारिडोर तयार करावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या पत्रपरिषदेला माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस डॅा.नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, हसनअली गिलानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.