गडचिरोली : महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत विजेचे दर जास्त आहेत अशी उद्योजकांसह सर्वांची ओरड होती, पण त्यामागे कारण होते. एकूण वीज वापराच्या 30 टक्के वापर शेतकरी करत असल्याने आणि त्यांना मोफत वीज दिली जात असल्याने ती कसर भरून काढण्यासाठी सर्वांवर थोडा बोझा वाढला होता. पण आता शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पॅनल लावले जात आहेत. त्यामुळे हा बोझा नक्की कमी होऊन विजेचे दर कमी होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश प्रवक्ता आणि उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस सीए समीर बाकरे यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीत रविवारी विश्राम भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एस.टी. मोर्चा) अशोक नेते, आ.डॅा.मिलिंद नरोटे, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॅा.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी जि.प.सभापती रमेश बारसागडे, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाकरे यांनी नुकत्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे विविध फायदे काय याची माहिती दिली. शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून त्यांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पात महत्वपूर्ण पावले उचलली असल्याचे बाकरे म्हणाले.
केंद्र सरकारने 25 वर्षांचा विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. त्यातील सुरूवातीची 10 वर्ष पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. आता ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ, रोजगार निर्मिती, एमएसएमई क्षेत्र, गुंतवणूक आणि निर्यात क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.