आष्टी : दोन दिवसांपूर्वी आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोमनपल्लीच्या बस थांब्यावर शेडच्या पत्र्यावर भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानजनक आणि आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांचा 48 तासांत शोध लावण्यात पोलिसांना यश आले. एका 18 वर्षीय नवतरुणासह एका अल्पवयीन मुलाने हे विक्षिप्त कृत्य केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी इतर काही ठिकाणी मानवी अवयवांची चिन्हे आणि अश्लील आकृत्याही रेखाटल्याचे समोर आले आहे.
मौजा सोमनपल्ली व दुर्गापूर येथे गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांद्वारे विकृत पद्धतीने मानवी अवयवांची चिन्हे, आकृत्या काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या प्रकरणाचा आष्टी पोलिसांकडून तपास सुरु होता. याचदरम्यान दि.21 रोजी सोमनपल्ली येथील बस थांब्यावरील घटना समोर आली. आष्टी पोलिसांनी त्या घटनेची माहिती लगेच वरिष्ठांना कळविली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आष्टी पोलीसांना दिला होता.
तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी ठाण्याचे पो.नि.विशाल काळे, स्थानिक गु्हे शाखेचे पो.नि.अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात अधिकारी व अंमलदारांची एकूण 10 तपास पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी केलेल्या तपासामध्ये एक गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली. ती म्हणजे आसपासच्या 10 कि.मी. हद्दीतील परिसरात काळ्या रंगाच्या शाईसदृश द्रवाने विविध अश्लिल आकृत्या अज्ञात माथेफिरूकडून मागील तीन दिवसांपासून बनविल्या जात आहेत.
पोलीस पथकांनी आष्टी व चामोर्शी हद्दीतील अनेक गावांना भेट देऊन मिळविलेल्या गोपनिय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी सुमित जगदिश मंडल (18 वर्ष) रा.दुर्गापूर, ता.चामोर्शी आणि एका अल्पवयीन आरोपीने मिळून सोमनपल्ली बस थांब्यावर सदर आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याची खात्री पोलिसांना झाली.पोलीसांनी तातडीने सदर आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्राविषयी अधिक विचारणा केली असता, आपल्याकडून सदर कृत्य घडल्याची कबुली त्या आरोपींनी दिली.
मानसिक विकृतीतून सदर आरोपींनी हे कृत्य केले असल्याचे लक्षात येते आहे. आष्टी पोलीसांनी आरोपी सुमित मंडल याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु केली. अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्राचा अधिक तपास आष्टीचे पोनि. विशाल काळे करीत आहेत.
हा तपास कामात पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात सपोनि भगतसिंग दुलत, सपोनि राहुल आव्हाड, आष्टीचे सपोनि मदन म्हस्के, पो.उपनिरीक्षक मनोज जासूद, सोमनाथ पवार, दयाल मंडल, काशिनाथ शेडमाके, प्रतीक्षा वनवे, तसेच अंमलदारांनी सहकार्य केले. सामाजिक सलोख्याचा विचार करुन अशा प्रकारचे कोणतेही कृत्य कोणीही करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गडचिरोली पोलिसांनी दिला आहे.