111 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 5 नोव्हेंबरला मतदान

कुठे सार्वत्रिक तर कुठे पोटनिवडणूक होणार

गडचिरोली : जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि पोट निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या सर्व ग्रामपंचायतींमध्ये 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित आणि सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य आणि थेट सरपंचपदाच्या) सार्वत्रिक
निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरीक पद्धतीने निवडणूक घेतली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार, 6 ऑक्टोबरला संबंधित तहसिलदारांनी निवडणुकीची अधिसूचना जारी केली. नामनिर्देशनपत्रे
मागविण्याचा व सादर करण्यासाठी 16 ते 20 ऑक्टोबर 2023 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबरला होणार असून नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत 25 ऑक्टोबरला (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा, तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 25 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजतानंतर, तर प्रत्यक्ष मतदान 5 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. मतमोजणी 7 नोव्हेंबर रोजी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

निवडणूक कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदारांनी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले आहे.

कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक

कोरची – 17 ग्रामपंचायती, कुरखेडा – 4, देसाईगंज – 1, आरमोरी – 1, गडचिरोली – 6, धानोरा – 26, चामोर्शी – 7, मुलचेरा – 4, अहेरी – 6, एटापल्ली – 13, भामरागड – 14 आणि सिरोंचा तालुक्यातील 12 अशा एकूण 111 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक होणार आहे.