देसाईगंज : वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक वरुण बी.आर. यांनी आमदार रामदास मसराम यांनी मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली. याशिवाय त्यांनी सुचवलेल्या कामांना केराची टोपली दाखली. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये विधानसभा अध्यक्षांकडे विशेष हक्कभंगाची तक्रार केली आहे. त्यावर आता काय कारवाई केली जाते याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.
आ.मसराम यांच्या तक्रारीनुसार, आरमोरी विधानसभा मतदार संघातील बराच भूभाग हा वन विभागाचा आहे. त्याअंतर्गत सन 2022 पासून झालेल्या विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर विकास कामे उपवनसंरक्षकांनी एकाच कंत्राटदाराला हाताशी धरुन केल्याचे दिसून येते. त्यामुळे यात बराच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही आ.मसराम यांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे त्यासंदर्भात आ.मसराम यांनी उपवनसंरक्षक वरूण यांच्याकडे संपूर्ण लेखी माहिती मागितली, मात्र त्यांच्याकडून कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे मसराम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. माहिती पाठविण्याबाबत अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन वारंवार सांगितले, मात्र आमदाराच्या सांगण्यावरुन आम्ही माहिती देत नाही, असे उद्धट उत्तर या अधिकाऱ्याकडून देण्यात आले.
तसेच जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आपण प्रस्तावित केलेली कामे वरुण यांनी न घेता माझ्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक अपमान होत असल्याने उपवनसंरक्षक वरुण बी.आर. व संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष हक्कभंगाची सूचना देत आहे. ती स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीकडे उचित कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावी, अशी विनंती आ.रामदास मसराम यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.