गडचिरोली-चिमूर लोकसभेसोबत तीनही विधानसभांवर काँग्रेसचा दावा

शिष्टमंडळाची दिल्लीवारी, हायकमांडने काय सांगितले?

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाने निवडणूक लढवायची यावरून सुरू झालेला वाद आता काँग्रेसने दिल्ली दरबारी पोहोचविला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. त्यात लोकसभेसोबत गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा काँग्रेसच लढविणार, असा आग्रह धरण्यात आला. त्यावर पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक प्रतिसाद देत कामाला लागण्याची सूचना केली असल्याचा दावा काँग्रेसच्या गोटातून करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. गडचिरोली-चिमूर हे लोकसभा क्षेत्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय मोठे असून गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करत आहे. मात्र यावेळी ही जागा महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आग्रह धरला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेता माजी खासदार मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, पवनकुमार बन्सल, अविनाश पांडे, के. राजू, माणिक टागोर, आशिष दुवा, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेते मंडळींची भेट घेऊन त्यांना स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती दिली.

कोणाची किती ताकद?

वर्तमान परिस्थितीचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषद, बाजार समितींमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून या लोकसभा क्षेत्राची मागणी होत आहे, त्यामुळे स्थानिक राजकीय परिस्थितीचा विचार करता काँग्रेस पक्ष अधिक वरचढ ठरणार असून ही जागा काँग्रेसच्या कोट्यातच राहावी, असा आग्रह गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी धरला. यावर काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही व लवकरच राष्ट्रीय स्तरावरून नेते मंडळी लोकसभेतील तालुकानिहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीची तयारी करणार असल्याचे सांगण्यात आले. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघातही काँग्रेसच निवडणूक लढविणार, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिल्याचा दावा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केला आहे.