बालगृहातील बालिकांनी जागविला कार्यालयांच्या सहलीतून आत्मविश्वास

एक दिवसीय अभ्यास सहलीचा अभिनव उपक्रम

गडचिरोली : विविध कारणांमुळे बालगृहात ठेवण्यात आलेल्या बालिकांमध्ये आत्मविश्वास यावा, त्यांना भविष्यातील करिअरची दिशा ठरवता यावी या उद्देशाने घोट येथील अहिल्यादेवी बालगृहातील मुलींसाठी एक दिवसाची अनोखी सहल आयोजित केली होती. त्यात विविध सरकारी कार्यालयांना भेट देऊन तेथील प्रमुखांशी त्यांची चर्चा घडवून आणण्यात आली.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्याअंतर्गत कार्यरत घोट येथील अहिल्यादेवी मुलींच्या बालगृहातील १६ मुली या एक दिवसीय सहलीत सहभागी झाल्या होत्या. सदर मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आदी प्रमुख शासकीय कार्यालयांना भेट देऊन तेथील कार्यालय प्रमुखांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. तसेच तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. प्रशासकीय क्षेत्रात अधिकारी बनण्यासाठी कशा प्रकारे परिश्रम घ्यावे लागेल आणि त्याकरिता कुठला अभ्यासक्रम शिकावा लागतो याविषयीची सविस्तर माहिती मुलींनी जाणून घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मोहन टिकले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका व विविध विभागांच्या कामकाजाविषयी माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, ओंकार पवार (IAS), निवासी उपजिल्हाधिकारी दर्शन निकाळजे यांनी मुलींना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शेखर शेलार , उप मुकाअ (स्वच्छता व पाणी पुरवठा) फरेंद्र कुतिकर यांनी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांची व योजनांची माहिती दिली.

जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांच्यासोबत बालिकांनी मनमोकळी चर्चा केली. यावेळी न्या.शुक्ल यांनी प्रत्येक बालिकेला व्यक्तिशः पुढे काय बनायचे आहे, याबाबत त्यांचे मत जाणून घेवून वैयक्तिक मार्गदर्शन केले. स्वानुभवातून त्याकरिता त्यांना कशा प्रकारे परिश्रम घ्यावे लागेल याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आयपीएस बनण्याकरिता कशी तयारी करावी, कुठले अभासक्रम आवश्यक आहेत याबाबत मार्गदर्शन केले.

बालिकांची ईच्छा केली पूर्ण

बालकल्याण समिती दर महिन्याला बालगृहाला भेट देऊन बालकांच्या अडचणी समजून घेत असते. त्यात बालिका वेळोवेळी सहलीला येण्याची विनंती करीत होत्या. त्यांना इतर ठिकाणी सहलीला नेण्यापेक्षा त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी व पुढील भविष्य उज्ज्वल करण्यासाठी चालना मिळावी म्हणून बालकल्याण समितीच्या पुढाकाराने व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या सहकार्याने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष वर्षा मनवर, सदस्य दिनेश बोरकुटे, काशिनाथ देवगडे, जिल्हा बाल संरक्षण अधीकारी अविनाश गुरनुले, तसेच अहिल्यादेवी बालगृहाच्या अधिक्षिका निर्मला टोपो, जयंत जथाडे, सामाजिक कार्यकर्ता तनोज ढवगाये, उज्वला नाकाडे, पूजा धमाले, प्रियंका आसुटकर उपस्थित होते.