डॅा.किरसान यांचे नामांकन दाखल करताना महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

विदर्भातील पाचही जागा जिंकणार- ना.वडेट्टीवार

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीमधील तीनही पक्षांनी शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. त्यानंतर अभिनव लॅान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नामांकन दाखल करण्यात आले. एक दिवस आधी याच ठिकाणी महायुतीची संकल्प सभा झाली. दोन्ही सभांची तुलना करत कोणाकडे जास्त गर्दी होती, अशी चर्चा गडचिरोलीकरांमध्ये सुरू आहे.

अभिनव लॅानमधील जाहीर सभेला काँग्रेसचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान, आमगावचे (जि.गोंदिया) आ.सहेषराव कोरोटे, माजी खासदार मारोतराव कोवासे, ओबीसी नेते बबनवराव तायवाडे, माजी आ.आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, पेंटाराम तलांडी, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, शिवसेनेचे (उबाठा) सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जेसा मोटवानी, प्रकास इटनकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना.विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच भाजपवासीय झालेले माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी यांचे नाव न घेता त्यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांचा हा निर्णय राजकीय आत्महत्या करणारा असल्याचे म्हटले. डॅा.नामदेव किरसान यांना लोकांचे उमेदवार म्हणून तिकीट मिळाल्याचे ते म्हणाले. लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे विदर्भात पहिल्या टप्प्यातील पाचही जागा काँग्रेसच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन रविंद्र दरेकर यांनी केले.